शेयर करा

soybean mosaic virus

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील पिवळा मोझॅक या रोगाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये पिवळा मोझॅक व्हायरस रोग (soybean mosaic virus) नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि पिवळा मोझॅक रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते.
2. या पिकाच्या लागवड क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने वाढ होत असून एकूण देशातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.
3. सोयाबीन मध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
4. जनावरांसाठी आणि पोल्ट्री उद्योगात देखील सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो.
5. सोयाबीन हे पीक आंतरपीक, पीक फेरपालटीमध्ये अतिशय महत्त्वाचे पीक असून सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे लागवड तंत्रज्ञान तसेच शिफारसीनुसार तण आणि किडींचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे.
6. या लेखामध्ये आपण सोयाबीन वर येणाऱ्या पिवळा मोझॅक (soybean mosaic virus) या रोगाविषयी जाणून घेऊ.



सोयाबीन मधील पिवळा मोझॅक (soybean mosaic virus) ची सध्याची स्थिती –

1. गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.
2. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते.
3. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो.
4. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत.
5. यावर्षी ही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे.
6. या रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे | soybean mosaic virus symptoms –

1. सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.
2. त्यानंतर पाने जशी परिपक्व होत जातात तशी त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.
3. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.
4. पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते.
5. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते.
6. दाण्यामधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.

पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार | soybean mosaic virus spread –

हा एक विषाणूजन्य रोग असून ‘मूगविन येलो मोजेक’ या विषाणूमुळे या रोगाचा प्रसार होतो. हा विषाणू पानातील रस मार्फत पसरतो. विषाणूचा प्रसार मुख्यतः पांढरी माशी या किटका द्वारे होतो.

प्रादुर्भावाची कारणे –

1. हा रोग दमट आणि थंड हवामानात (तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस) मध्ये जास्त आढळतो.
2. हा रोग सोयाबीन मोझॅक पॉटीव्हायरस या विषाणूमुळे होतो.
3. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामातील मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
4. या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस 335 हा वाण या रोगास बळी पडतो.



पिवळा मोझॅक रोगाचे एकात्मिक नियंत्रण | yellow mosaic virus in soybean control –

1. वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.
2. पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण जात उदा. जे एस 2029, जे एस 2069, जे एस 9752 ची लागवड करावी.
3. सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
4. शेत तणमुक्त ठेवावे.
5. शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.पिवळा मोझॅक चा प्रादुर्भाव झालेली पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत, जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
6. 12 इंच x 10 इंच आकाराचे हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत.
7 .फवारणीसाठी कीटकनाशक व पाण्याची शिफारस केलेली मात्रा वापरावी.
8. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
9. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावं.
10. पावसाचा ताण पडल्यास पिकांना संरक्षित पाणी द्यावे.
11. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथॉक्झाम (25 टक्के) 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
12. पीक पेरणीनंतर 35 दिवसांनी 0.5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोयाबीन या पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस चे (soybean mosaic virus) एकात्मिक नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. सोयाबीन मधील पिवळा मोझॅक हा रोग कोणत्या व्हायरस मुळे होतो?
उत्तर – हा एक विषाणूजन्य रोग असून ‘मूगविन येलो मोजेक’ या विषाणूमुळे या रोगाचा प्रसार होतो.

2.सोयाबीन मधील पिवळा मोझॅक रोगासाठी कोणते कीटकनाशक मारावे?
उत्तर – रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ॲक्टरा, सिजेंटा,थायोमिथॉक्झाम (25 टक्के) 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

3. पिवळा मोझॅक व्हायरस रोगासाठी सोयाबीनच्या कोणत्या जाती प्रतिकारक वाण म्हणून वापरतात?
उत्तर – सोयाबीन पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. तसेच रोग प्रतिकारक वाण जात उदा. जे एस 2029, जे एस 2069, जे एस 9752 ची लागवड करावी.

लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा