शेयर करा

murghas

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मुरघास (murghas) बनवण्याची संपूर्ण माहिती या बद्दल माहिती पाहणार आहोत.

प्रस्तावना –

शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. परंतु पशुपालन करत असताना त्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. पशुपालन करत असताना चारा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण चारा व्यवस्थापन व्यवस्थित झाले, तरच पशुपालन व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी वर्षभर पुरेल असं चारा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, यामध्ये हिरवा चारा, वाळलेला चारा अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करता येते. वाळला चारा आपण वर्षभर सहजरीत्या साठवण करून ठेवू शकतो, परंतु हिरवा चारा वर्षभर पुरेल अशा पद्धतीने त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये ज्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असेल, त्या भागात शेतकरी वर्षभर हिरवा चारा आपल्या शेतामध्ये पिकवू शकतात परंतु काही दुष्काळी भागामध्ये शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होत नाही, अशा वेळेस जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याचे व्यवस्थापन करणे खूप अवघड होते. परंतु याला पर्याय म्हणून मुरघास (murghas) करणे योग्य ठरू शकते मुरघास हा वर्षभर टिकू शकतो.



मुरघास म्हणजे काय? | What is murghas?  –

मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्यामध्ये कल्चर, गुळपानी किंवा मिठ असे वेगवेगळे मिश्रण कुट्टी मध्ये एकत्र करून त्याला हवा विरहित किंवा हवाबंद जागेत साठवण करून ठेवणे. आपल्याला गरज लागेल त्यावेळेस तो वापरणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिरव्या चाऱ्याचं लोणचं घालने यालाच मुरघास असे म्हणतात.

मुरघासासाठी कोणती चारा पिके जास्त फायदेशीर ठरू शकतात?

यामध्ये मका, कडवळ, बाजरी ही सर्व पिके मुरघास करण्यासाठी सर्वात जास्त योग्य समजली जातात. यांना योग्य समजण्याचं कारण म्हणजे यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर उसाचे वाढे देखील मुरघास बनवण्यासाठी वापरू शकता.

मुरघास बनविण्यासाठी चारा पिकाची कापणी केव्हा करावी?

Murghas बनवण्यासाठी चारा पिकाची कापणी करण्यासाठी ते पीक तुऱ्यामध्ये किंवा चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे. मका पिकाबद्दल बोलायचं झाल्यास, मक्याचे कणीस तयार होत असताना त्याच्या दाण्यामधून दुधासारखा रस येत असावा, तसेच कडवळ आणि ज्वारी हे पीक चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे. ज्यावेळी मका कडवळ बाजरी ही पिके तुऱ्यामध्ये असतात त्यावेळी त्या पिकाच्या ताटामध्ये पूर्णपणे न्यूट्रिशन प्रोटीन इत्यादी घटक असतात. म्हणजे त्या पिकाचे सर्व अवशेष हे सर्व घटकांनी परिपूर्ण व पौष्टिक असतात अशा वेळेस मुरघास केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. परंतु या पिकांची कणसे त्यातील दाना पूर्ण पक्व झाल्यास त्या पिकाच्या ताटामध्ये किंवा चिपाडामध्ये न्यूट्रिशन हे अजिबात राहत नाहीत. ते सर्व त्या पिकाच्या दाण्यांमध्ये एकवटतात अशावेळी पिकांच्या इतर चिपाडामध्ये किंवा ताटामध्ये पौष्टिकता नसते.

मुरघास साठवण्याची पद्धत | Murghas storage method –

1. मुरघास साठवणीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो.
2. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे बॅगांचा वापर केला जातो. यामध्ये 50 किलो पासून तीन टनापर्यंत बॅग मिळतात. 3. बॅगमध्ये मुरघास भरण्याअगोदर त्याला आतून प्लास्टिक बॅग वापरली जाते.
4. दुसरी पद्धत म्हणजे खड्डा पद्धत यामध्ये जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याला शेततळ्याचा कागद वापरून त्यामध्ये मुरघास साठवता येतो.
5. तिसऱ्या पद्धतीमध्ये बंकर पद्धत, बंकर पद्धतीमध्ये आपल्याला जमिनीच्या वरती हवाबंद असे बांधकाम करून त्यामध्ये मुरघास करता येतो.
6. चौथी पद्धत म्हणजे बेलर किंवा गठ्ठे पद्धत यामध्ये मशीन मध्ये मकाची कुट्टी भरून त्याची मशीनच्या आधारे दाब देऊन गठ्ठे बनवले जातात, व त्याला प्लास्टिक पेपरच्या सहाय्याने गुंडाळले जाते परंतु ही पद्धत जास्त खर्चिक असते.

मुरघास बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Material for murghas preparation –

1. चारा पिके (एकदल आणि द्विदल पिके प्रमाण – 4:1)
2. 500 जीएसएम ची मुरघास बॅग
3. एकदल पिकासाठी – 1 किलो शिफारशीत फीड ग्रेड यूरिया + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी )
4. द्विदल पिकांसाठी – 4 किलो गूळ + 100 लीटर पानी / 200 किलो चाऱ्यासाठी )
5. चारा कुट्टी मशीन.



मुरघास तयार करण्याची पद्धत | Silage making process –

1. सर्व प्रथम मार्केट मधून चांगल्या प्रतीची मुरघास बॅग खरेदी करा.
2. या बॅग ची साइज तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. जशी की – 1, 2 किंवा 5 टन.
3. बॅग चा रंग हा पांढरा निवडावा.
4. यानंतर निवडलेल्या पिकाची फुलोरा अवस्थेमध्ये असताना बारीक कुट्टी करून घ्यावी.
5. या वेळी पिकामध्ये योग्य ओलावा असेल याची काळजी घ्यावी व कुट्टी नंतर ओलावा कमी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. म्हणजे लगेच चारा बॅगेत भरावा.
6. चारा बॅगेत 1 फुटापर्यंत भरावा आणि लगेच पायाने दाबून घ्यावा, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहणार नाही.
7. कारण जर बॅगेत हवा राहिली तर त्यामध्ये बुरशी लागू शकते.
8. अश्याप्रकारे टप्या-टप्याने थर देऊन बॅग भरून घ्यावी व प्रत्येक थरावर, एकदल पिकासाठी – 1 किलो शिफारशीत फीड ग्रेड यूरिया + 100 लीटर पानी प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
9. जर तुमच्याकडे द्विदल पिके असतील तर द्विदल पिकांसाठी – 4 किलो गूळ + 100 लीटर पानी या प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
10. अश्याप्रकारे तुमचा एका चौरस फुटामध्ये तुमचं 15 ते 16 किलो मुरघास तयार होईल.
11. नंतर भरलेली बॅग सुरक्षित जागी सावलीला ठेऊन द्यावी. पुढील 45 ते 50 दिवसात अगदी चांगल्या प्रकारचा चारा तयार होईल.
12 . तयार झालेला चारा तुम्ही पुढील 5 ते 6 महिने वापरू शकता.

जनावरांना मुरघास किती द्यावा?

1. गाई व म्हशीचे – 20 ते 25 किलो मुरघास द्यावा.
2. हा चारा दिवसातून 2 ते 3 वेळा द्यावा.
3. चारा जर जास्तच आंबट किंवा आम्लयुक्त असेल तर तो थोडा वेळ सुकून द्यावा.
4. शेळी आणि मेंढीला हा चारा 500 ते 700 ग्राम द्यावा.
5. दुधाळ जनावरांना हा चारा धारा काढल्यानंतर द्यावा.

मुरघास वापरण्याचे फायदे | Benefits of silage making –

1. मुरघास अवघ्या 45 ते 50 दिवसात तयार होतो, आणि तो पुढील 5 ते 6 महीने वापरता येतो.
2. जेणेकरून शेत पुढील पिकासाठी मोकळे होते व उन्हाळी हंगामात देखील जनावरांना सकस आणि हिरवा चारा देता येतो.
3. कमी शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हा उत्तम पर्याय आहे.
4. दुष्काळी भागात देखील उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा देता येतो.
5. मुरघासामध्ये इतर चाऱ्यापेक्षा अधिक सकस घटक असल्या मुळे जनावरांचे दूध देखील वाढते.
6. सतत हिरवा आणि सकस चारा दिल्यामुळे जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहते.
7. कमीत-कमी जमिनीसह अधिक जनावरांचा गोठा सांभाळणे शक्य होते.
8. शेतकऱ्याचा चाऱ्यावरील खर्च कमी होतो.



मुरघास बॅग किंमत | Price of murghas bag –

1. Murghas bag 50 kg price –

साधारणतः 50 रूपये / बॅग
टीप – वेगवेगळ्या ठिकाणी किमतीमध्ये फरक असू शकतो.

2. Murghas bag 1000 kg price –

साधारणतः 350 ते 400 रूपये / बॅग
टीप – वेगवेगळ्या ठिकाणी किमतीमध्ये फरक असू शकतो.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील murghas: मुरघास बनवण्याची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. मुरघास म्हणजे काय?
उत्तर – मुरघास (silage) म्हणजे मुरलेला चारा. मका, ज्वारी, बाजरी, संकरीत नेपीयर गवत, मारवेल गजराज आणि मिनी गवत इत्यादि पिकांना फुलोरा अवस्थेमध्ये आल्यावर कापून बारीक तुकडे करतात व त्यांच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून 45 ते 50 दिवसांसाठी हवाबंद करून ठेवले जाते. जेणेकरून पुढील पाच ते सहा महीने त्याचा एक हिरवा चारा म्हणून वापर करता येईल. खास करून कमी क्षेत्र आणि कोरडवाहू / कमी पावसाच्या भागात याचा वापर केला जातो.

2. मुरघास किती दिवसात तयार होतो?
उत्तर – मुरघास (silage) हा व्यवस्थित प्रक्रिया करून योग्य पद्धतीने हवाबंद करून ठेवल्यास अवघ्या 45 ते 50 दिवसात तयार होतो.

लेखक –

K Suryakant


शेयर करा