शेयर करा

fruit dropping

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पिकांमध्ये होणाऱ्या फळगळ (fruit dropping) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये फळ गळ होण्याची कारणे आणि फळ गळ रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

फळपिकांमध्ये विविध कारणांमुळे फळगळ (fruit dropping) आढळून येते. शेतकरी मित्रानो बऱ्याच वेळा टोमॅटो, मिरची वांगे यासारख्या फळभाजी पिकामध्ये आणि डाळिंब, संत्री मोसंबी या सारख्या फळ पिकामध्ये जास्त फुले येऊन हि फुल व फळ गळ झाल्याने हाती कमी उत्पादन लागते. या साठी फुल आणि फळगळ (fruit drop) होण्याची कारणे जाणून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.



फळ गळ होण्याची कारणे | Reasons behind fruit dropping –

1. भारी काळ्या जमिनीत सतत पावसामुळे जास्त काळ ओलावा राहिल्याने जमिनीत हवा खेळती राहत नाही.
2. त्यामुळे झाडाच्या मुळांद्वारे होणारी अन्नद्रव्ये वहन क्रिया मंदावते.
3. यामुळे झाडाची पाने पिवळी पडणे, पानगळ, फुलगळ आणि फळगळ यासारख्या समस्या येतात.
4. तसेच मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेंड्याकडून झाड वळण्याची समस्या येते.
5. ढगाळ वातावरणात अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे अन्नद्रव्ये निर्मिती क्रिया कमी होऊन देखील फळांची गळ होते. 6. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे गरजेचे असते.
7. जी फळे बहाराच्या सुरुवातीलाच पानविरहित फांद्यांवर पोसली जातात, त्यांची वाढ मंद गतीने होऊन, ती कमकुवत राहतात.
8. जी फळे नवतीसोबत फुलांपासून तयार होतात त्यांची वाढ चांगली होते.
9. वातावरणातील तापमान जास्त असल्यास आणि पाण्याचा ताण पडणे हे देखील घटक फळगळ होण्यास कारणीभूत आहेत किंवा दिवस रात्रीच्या तापमानात जास्त तफावत झाल्यास देखील फळगळ होते.
10. असंतुलित अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा – झाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते.
11. बहार धरल्यापासून बागेस मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अशी सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये यांचे संतुलित नियोजन करणे आवश्यक आहे तसेच जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
12. फळमाशीचा प्रादुर्भाव – फळ माशी फळाला डंक करून आतील रसशोषण करते. त्यामुळे फळ खराब होऊन गळ होते.
13. यावर उपाययोजना म्हणून बागेत फुले लागताच फळमाशीच्या सापळे लावावे.
14. तसेच फळ सेटिंग झाल्यावर फळांना प्लास्टिक बॅग लावावे. तसेच किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कीटकनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
15. बुरशीचा प्रादुर्भाव होणे – फळांच्या देठाजवळ बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने फळ देठाजवून कमकुवत होऊन फळांची गळ होते.
16. अश्या विविध कारणांमुळे फळपिकात मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन आर्थिक नुकसान होते, यासाठी वरील सगळ्या बाबी लक्षात घेऊन बागेचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.



फळगळ होण्याचा अवस्था, वेळ आणि गळ (टक्के) –

1. फळधारणेची वेळ | फेब्रुवारी- मार्च | 67.00 टक्के
2. उन्हाळा | एप्रिल-मे | 19.20 टक्के
3. पक्वतेपूर्वी | जून- सप्टेंबर | 7.8 टक्के
4. तोडणीपूर्वी | ऑक्टोबर- डिसेंबर | 1.2 टक्के

फळगळ कमी करण्याकरिता उपाययोजना | Control measures for fruit dropping –

1. खतांची (सेंद्रिय व रासायनिक) मात्रा शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावी.
2. नत्राची अर्धी मात्रा, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाशची मात्रा पहिले पाणी देण्याच्या वेळी द्यावी.
3. उरलेली नत्राची अर्धी मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी. खते रिंग पद्धतीने द्यावीत.
4. खते ठिबक सिंचनाबरोबर देता आली तर फायदेशीर ठरते.
5. जमिनीची मगदूर, झाडाचे वय आणि शाखीय वाढ पाहून पाण्याच्या पाळ्या आठ ते 12 दिवसांच्या अंतराने द्याव्यात. पाणी दुहेरी रिंग पद्धतीने द्यावे.
6. पाणीटंचाई असल्यास एक दांड पद्धत किंवा दुहेरी दांड पद्धतीने किंवा अर्धे आळे पद्धतीने झाडांना पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सोय करावी.
7. पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी.
8. मुख्यतः ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांत बागेत पाणी साचून राहिल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ होते.
9. बागेत पाणी साचून राहत असल्यास दोन किंवा तीन ओळींत एक याप्रमाणे चर काढून पाणी बागेच्या बाहेर काढावे.
10. बागेच्या भोवती दक्षिण व पश्‍चिम दिशेस हेटा, शेवरी सारखे वारा प्रतिबंधक झाडे लावावीत.
11. झाडावरील साल नियमित काढावी. शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
12. आंबिया बहरातील फळांची गळ प्रथमावस्थेत आणि ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या काळात होते, ती गळ कमी करण्यासाठी या काळात प्रत्येक महिन्यात तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दहा पी.पी.एम. एन.ए.ए. अधिक एक टक्का युरिया (दहा ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी) या तीव्रतेचा संजीवकांचा फवारा द्यावा.
13. झाडावर साधारणतः 600 ते 800 इतकीच फळे घ्यावीत.
14. आंबिया बहराच्या फळांतील रस शोषणाऱ्या पतंगांचा प्रादुर्भाव सप्टेंबर- ऑक्‍टोबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो. यासाठी बागेच्या परिसरातील तणांचे नियंत्रण करावे.
15. यामुळे पतंगांचा उपद्रव कमी होण्यास मदत होते.
16. बागेत रात्री धूर केल्यास पतंगांचा प्रादुर्भाव कमी होतो. दररोज खाली पडलेली फळे उचलून खड्ड्यात पुरून टाकावे. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात.
17. प्रकाश सापळ्याच्या खाली पसरट भांड्यात गुळाचे पाणी, संत्र्याचा रस आणि मॅलॅथिऑन कीटकनाशकाचे द्रावण तयार करून ठेवावे. या द्रावणात पतंग येऊन पडतात.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा fruit dropping: जाणून घ्या फळ गळी मागची कारणे आणि ठोस उपाय हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा
शॉपिंग कार्ट