शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकामध्ये कोणती आंतरपिके (sugarcane intercropping) घेऊ शकतो पाहणार आहोत.
प्रस्तावना –
ऊस लागवड केल्यानंतर पूर्ण उगवणीसाठी सहा ते आठ आठवडे कालावधी लागतो. सुरूवातीच्या काळात वाढ हळू होते. ऊसाच्या दोन सर्यांमध्ये मोकळ्या जागेत आंतरपीक (intercropping) घेतल्याने तणांचे प्रमाण कमी होते. सुरू ऊसामध्ये भुईमूग, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतर पिके फायद्याची ठरतात. द्विदल वर्गातील आंतरपीक घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. उसामध्ये आंतरपीक (sugarcane intercropping) घेतल्याने नक्कीच फायदा होतो. प्रामुख्याने उसाचे निव्वळ उत्पन्नात वाढ होतो. उसाचे बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी झालेला खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून निघतो.
ऊस पिकात आंतरपीक घेतल्या मुळे होणारे फायदे | Benefits of sugarcane intercropping –
1.ऊस पिकात मोकळी जागा असते तिथे आंतरपिकं घेता येते.
2. आंतरपिके घेतल्याने भरपूर फायदा होतो.
3. प्रामुख्याने आंतरपीक यामुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते.
4. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो.
5. तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते.
6. द्विदल वर्गातील आंतरपीक घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
7. ऊस पिकात भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबिर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतर पिके घेतली जातात.
8. वरील प्रमाणे ऊस पिकात आंतर मशागत (inter cultivation) आणि अंतर पिके घेतली जातात.
ऊस पिकामध्ये घेतली जाणारी आंतरपिके | List of sugarcane intercropping –
1. सुरू ऊस-कांदा | Sugarcane + Onion –
सुरू ऊस सहा ते आठ आठवड्यांचा झाल्यानंतर म्हणजेच त्याचे कोंब जमिनीवर उगवून आल्यानंतर कांदा या पिकाच्या रोपांची वरंब्याच्या दोन्ही बाजूला लागण करावी. या आंतरपिक पद्धतीमध्ये कांद्याला उसाबरोबरच पाणी आणि खते मिळतात. त्यामुळे त्याला वेगळे पाणी आणि खत देण्याची गरज भासत नाही. कांद्याची मुळे ही जमिनीत खूप खोलवर जात नाही. ती फक्त पाच ते दहा सें. मी. एवढ्या खोलवर जातात. त्यामुळे तेवढ्यात जमिनीतून ती अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्याचा ऊस या मुख्य पिकावर कोणताही परिणाम होत नाही. विशेषत: सुरूवातीच्या काळात ऊसाची वाढ खूप मंद गतीने होत तर त्याच काळात कांद्याची वाढ जलद गतीने होते त्यामुळे कांदा काढणीसाठी साडेतीन ते चार महिन्यात तयार होतो.
आंतरपिक (intercrop) म्हणून लागवड केलेल्या कांद्याची उत्पादकता सरासरी 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी मिळते कारण या कांद्याची लागवड आपण रोपाची पुनर्लागन करून केलेली असते असे हे आंतरपिक ऊस या मुख्य पिकाबरोबर पाणी, प्रकाश, अन्नद्रव्ये यांबाबतीत कुठेही स्पर्धा करत नाही. व शेतकर्याला दुहेरी उत्पन्न मिळवून देते.
2. सुरू ऊस + भुईमूग | Sugarcane intercropping with Groundnut –
ही आंतरपिक पद्धती जमिनीशी सुपिकता वाढवण्यासाठी तसेच अतिरिक्त उत्पन्न व नफा मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सुरू ऊसाचे कोंब जमिनीवर आल्यावर भुईमूग या पिकाची लागवड टोकण पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूला करावी. कांद्याप्रमाणेच भुईमूग या पिकाला वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. सुरूवातीलाच खताबरोबर जमिनीमध्ये अन्नद्रव्ये मिसळलेली असतात तसेच ऊस पिकाच्या गरजेनुसार पिकाला पाणी दिले तरी चालते. भुईमूग हे पीक जमिनीत नत्र स्थिरिकरण करणारे पीक आहे. या पिकाच्या मुळांच्या गाठीत रायझोबियम नावाचे जिवाणू हवेतील नत्र जमिनीत स्थिरीकरण सहजीवी पद्धतीने करतात. भुईमूग या पिकाने जमिनीत स्थिर केलेले नत्र नंतर सुरू ऊस या पिकाला उपलब्ध होते. याचा मोठा फायदा ऊसाला होतो. ऊसाच्या वाढीवर भुईमूग हे आंतरपिकावर कोणताही परिणाम करत नाही. या पद्धतीमध्ये भुईमूगाचे हेक्टरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवता येते.
3. सुरू ऊस + काकडी/कलिंगड | Sugarcane + Cucurbits/Watermelon –
ही आंतरपिक पद्धती उन्हाळ्यामध्ये काकडी/कलिंगड या वेलवर्गीय फळपिकांना असलेली मागणी लक्षात घेवून केली जाते. या आंतरपिक पद्धतीत जेव्हा सुरू ऊसाचे पीक सहा ते आठ आठवड्याचे होते म्हणजेच ऊसाचे कोंब उगवून जमिनीवर येतात त्यावेळी प्रत्येक वरंब्याच्या एका कडेला साधारणपणे दोन फुट अंतरावर एक बी याप्रमाणे टोकण पद्धतीने लावतात. काकडी/कलिंगड हे वेलवर्गीय फळपिक असल्यामुळे हे जमिनीवर समांतर पद्धतीने वाढते. या वेलाची वाढ वरंब्यावर केली जाते तसेच या वेलाची फळे वरंब्यावर तसेच सरीमध्ये जेथे ऊस कोंबामध्ये अंतर आहे अशा ठिकाणी वाढवली जातात. या आंतरपिकाला कोणत्याही प्रकारे वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता नसते तसेच या पिकांमुळे ऊस या पिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही तसेच त्याच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही.
आंतरपिक पद्धतीमुळे शेतकर्यास काकडीचे 75 ते 100 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते तसेच कलिंगडापासून 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. ही आंतरपिके तीन ते साडेतीन महिन्यांत येणारी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात या आंतरपिकांना बाजारात खूप मागणी असते व तसेच ही आंतरपिके शेतकर्यांना अधिक नफा मिळवून देतात.
4. सुरू ऊस + मेथी/कोथिंबीर | Sugarcane + Spinach/Coriander –
– ही आंतरपिक पद्धती शक्यतो शहरांच्या जवळपास असणार्या ऊस क्षेत्रामध्ये घेतली जाते.
– उन्हाळामध्ये मेथी/कोथिंबीर या भाज्यांना बाजारात खूप मागणी असते.
– त्यामुळे शेतकरी नगदी पैसा मिळवण्यासाठी सुरू ऊसात मेथी/कोथिंबीर या भाज्यांची लागवड करावी.
– ऊस उगवून आल्यानंतर दोन्ही वरंब्याच्या बाजूने मेथी/ कोथिंबीर यांची लागवड करावी.
– या आंतरपिक पद्धतीमुळे शेतकर्यांना कमी कालावधीत नगदी पैसा पिकावर कोणताही परिणाम होत नाही.
5.ऊसासोबत + आले लागवड | Sugarcane intercropping with Ginger –
– उसाबरोबर अद्रकाची सहाय्यक पीक म्हणून लागवड करता येते.
– उसासोबत सहाय्यक पीक म्हणून आल्याची लागवड करण्यासाठी अर्धा फूट उंचीचे बेड तयार करा, ज्याची रुंदी सुमारे 1 मीटर आणि लांबी आपल्या सोयीनुसार ठेवावी.
– शिफारशीत उपलब्ध बियाणे वापरावे. लावणी करताना 25 ग्रॅम निंबोळी पेंडीची पावडर लागवडीच्या खड्ड्यात जमिनीत मिसळा.
– लागवड 25 सें.मी रेषा ते ओळ अंतर आणि 20 ते 25 सें.मी. कंद ते कंद अंतरावर करा.
– पेरणीसाठी 20 ते 30 ग्रॅम कंद वापरावेत.
– कंद लावण्यापूर्वी त्यावर चांगले कुजलेले खत आणि ट्रायकोडर्मा बुरशीचा मिश्रणाने उपचार करा.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा sugarcane intercropping: जाणून घ्या ऊस पिकामध्ये अंतर पीक म्हणून कोणते पीक लावावे? हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489