शेयर करा

grassy shoot of sugarcane

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकातील गवताळ वाढ (grassy shoot of sugarcane) विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तसेच गवताळ वाढीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. गवताळ वाढ (grassy shoot of sugarcane) हा फायटोप्लाझ्मा या अति सूक्ष्म जिवाणूंमुळे होणारा रोग आहे.
2. या रोगाचे जास्त प्रमाण हे मुख्यतः लागणीपेक्षा खोडवा पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
3. महाराष्ट्रातील प्रचलित जातींमध्ये को – 419, को – 740, को – 7527 आणि को.सी. – 671 या जाती या रोगास कमी ते मध्यम प्रमाणात बळी पडलेल्या दिसून येतात.
4. परंतु हा गवताळ वाढ रोग (sugarcane grassy shoot disease) अलीकडील प्रसारित जातींच्या खोडव्यामध्येही काही अंशी दिसू लागला आहे.



गवताळ वाढ रोगाची लक्षणे | Symptoms of grassy shoot of sugarcane –

1. गवताळ वाढ हा रोग उसामधील वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये महत्त्वाची लक्षणे दर्शवितो.
2. रोगग्रस्त उसाची प्राथमिक लक्षणे लावणीनंतर अथवा खोडव्यातील उगवून आलेल्या उसाच्या पानावर दिसून येतात.
3. फायटोप्लाझ्मामुळे लागण झालेल्या उसाच्या पानांमध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे पाने पांढरी अथवा पिवळसर पडलेली दिसून येतात, याला अल्बिनो रोग म्हणतात.
4. अशा उसाच्या बेटांमधून असंख्य फुटवे घेऊन अशी बेटे खुरटी राहतात.
5. हे फुटवे निव्वळ पांढरट अथवा पिवळसर दिसून त्याची पाने अरुंद, लहान, टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसून येतात व त्यास गवताच्या ठोंबांचे स्वरूप येते.
6. काही वेळेस नुसतेच रंगाचे असंख्य फुटवे असलेले दिसून येतात.
7. अशा गवताळ बेटांमध्ये नव्याने येणारे फुटवे फार दिवस टिकत नाहीत, गाळपालायक ऊस तयार होत नाहीत.
8. प्रादुर्भावग्रस्त उसाच्या बेटामधील पाने ही टोकाकडून जळत जाऊन उसाचे बेट पूर्णतः मरून जाते.
9. प्रादुर्भावग्रस्त बेटांमध्ये क्वचित ठिकाणी करंगळीएवढे अथवा त्यापेक्षा लहान ऊस तयार होतात.
10. अशा उसावरील कांड्या आकाराने खूपच बारीक तयार होऊन कांड्यांवरील डोळे वेळेअगोदर फुटून त्यामधून पिवळी पाने बाहेर येतात आणि जमिनीलगतच्या कांड्यांवर मुळ्या आलेल्या दिसून येतात.

आर्थिक नुकसान –

1. प्रादुर्भावग्रस्त ऊस बेटा मध्ये गाळप लायक ऊस तयार होत नसल्यामुळे ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते.
2. या रोगामध्ये नवीन तयार होणारे फुटवे मरून गेलेले दिसतात.
3. काही ठिकाणी एखादा दुसरा ऊस असल्यास त्याच्या कांड्या करंगळीएवढ्या वा त्याहून बारीक दिसतात.
4. या उसाची जाडी व उंची कमी असते.

गवताळ वाढ रोगावर उपाययोजना | Control measures for grassy shoot of sugarcane –

1. रोगमुक्त बेणे मळ्यातील ऊस लागवडीसाठी वापरावा, दर तीन वर्षांतून बेणे बदलून प्रमाणित बेणे वापरावे.
2. लागवडीनंतर किंवा खोडव्यामध्ये गवताळ वाढीची बेटे आढळून आल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.
3. लागवडीपूर्वी बियाण्यास उष्ण जल अथवा उष्ण बाष्पाची प्रक्रिया करावी किंवा अशी प्रक्रिया केलेल्या बेणेमळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे.

अ) उष्ण जल बीजप्रक्रिया –
👉या बीज प्रक्रिया मध्ये उसाच्या टिपऱ्या 52 अंश से. तापमान असलेल्या पाण्यामध्ये दोन तास ठेवून त्यानंतर लागण करावी.

ब) उष्ण बाष्प बीजप्रक्रिया –
👉या बीज प्रक्रिया मध्ये उसाच्या टिपऱ्या 54 अंश से. तापमानात बाष्पयुक्त हवा असलेल्या संयंत्रामध्ये तीन तास ठेवून त्यानंतर लागण करावी.
👉अशी प्रक्रिया मूलगुणी व मूलभूत बेणे तयार करण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे केली जाते, त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्याने पाडेगाव येथील संशोधन केंद्रातून बेणे आणून ते कारखान्यांच्या बेणे मळ्यात वाढवावे.
👉हे बेणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी द्यावे. यामुळे या रोगाचे प्रमाण वाढणार नाही.

4. ऊस पिकावर आढळणाऱ्या रसशोषण करणाऱ्या मावा किडी मार्फत या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ शकतो, त्यामुळे वेळोवेळी नियमितपणे पिकांचे सर्वेक्षण करून आढळून येणाऱ्या किडीवर आंतरप्रवाही कीटकनाशकांची (दीड मि.लि. डायमिथोएट प्रति लिटर) फवारणी करावी.
5. रोगप्रतिकारक अथवा रोगास कमी बळी पडणाऱ्या जाती को – 86033 आणि फुले – 0265 या जातींची लागवड करावी.
6. लागवडीखालील उसामध्ये गवताळ वाढ (sugarcane grassy shoot) जास्त प्रमाणात असल्यास अशा उसाचा खोडवा घेऊ नये अथवा त्यामधील ऊस बियाणे म्हणून वापरू नये. अशी बेटे उपटून त्याठिकाणी निरोगी ऊस बेण्याची लागण करावी.
7. ऊस वाढीच्या अवस्थेत आणि उसाची तोडणी करताना गवताळ वाढीची बेटे दिसून आल्यास ती उपटून जाळून नष्ट करावीत; तसेच तोडणीसाठी वापरण्यात येणारा कोयता अधूनमधून विस्तवावर गरम करून अथवा उकळत्या पाण्यात बुडवून अथवा दोन टक्के फेनॉलच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून वापरावा.
8. ऊस बेणेमळा तयार करताना सर्व शिफारशीत बीजप्रक्रिया करून रोगमुक्त बियाणे तयार करावे आणि असे बियाणे लागवडीसाठी वापरावे.
9. खोडवा उसातील गवताळ वाढीची बेटे दिसताच तात्काळ काढून टाकावी, त्यामुळे या रोगाचा इतर बेटांवर किडा द्वारा प्रसार होणार नाही.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील grassy shoot of sugarcane: ऊस पिकातील गवताळ वाढ नियंत्रण कशी करावी? हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. ऊसाला पक्व होण्यासाठी किती महिने लागतात?
उत्तर – सुरू ऊस पीक शेतामध्ये 12 ते 14 महिने उभे असतो.यासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या जातींची निवड करावी.

2. उसाचे फुटवे येण्यासाठी काय करावे?
उत्तर – ऊसाची उत्तम उगवण आणि चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाश ची गरज असते. तसेच जोमदार फुटवे येण्यासाठी नत्राची गरज असते.

लेखक –

K Suryakant


शेयर करा