शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हरभरा लागवड (chickpea cultivation) करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये हरभऱ्यासाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, हरभऱ्याच्या लागवडीची पद्धत (kabuli chana farming) आणि पाणी व्यवस्थापन, हरभऱ्याची काढणी आणि उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
जमिनीची निवड | Soil selection for the chickpea farming –
1. मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ठरते.
2. चोपण, निचरा न होणाऱ्या जमिनीत तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
3. जमिनीची कमीत कमी मशागत करावी. त्यामुळे जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
पेरणीचा कालावधी व पद्धत | Sowing time for chickpea cultivation –
1. जिरायती हरभऱ्याची पेरणी ( harbhara perni) ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
2. जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या राखण्याकरिता बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे.
3. ओलिताखाली हरभरा ऑक्टोबरच्या दुसरा पंधरवड्यात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी 10 नोव्हेंबर च्या आसपास करावी.
4. देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर 30 सें.मी., तर दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे.
काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे.
5. ओलिताखालील हरभऱ्याच्या पेरणीसाठी रुंद वाफा पद्धत वापरणे फायद्याचे ठरते.
बियाण्याचे प्रमाण | Seed rate –
हरभरा वाणांच्या लहान दाण्यांचा वाणाकरिता (उदा. विजय, विशाल, दिग्विजय,आयसीसीव्ही-10, एकेजीएस-1, साकी 9516) : 50-60 किलो प्रतिहेक्टर.
मध्यम आकारमानाच्या वाणाकरिता (उदा. जाकी 9218) : 75-80 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
काबुली वाणांमध्ये आयसीसीव्ही-2, पीकेव्ही काबुली-2 व पीकेव्ही काबुली-4 : 100 ते 125 किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सुधारित वाण | Improved varieties for chickpea farming –
अ) देशी हरभरा –
हा हरभरा मुख्यत्वे डाळीकरिता व बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणतः दाण्याचा रंग फिक्कट काथ्या ते पिवळसर असतो. दाण्याच्या आकार मध्यम असतो.
1. भारती (आय.सी.सी.व्ही. 10) – हा वाण जिरायती, तसेच बागायती परस्थितीत चांगला येतो. हा वाण मर रोग प्रतिबंधक असून, 110 ते 115 दिवसात काढणीस तयार होतो. जिरायतीत हेक्टरी 14 ते 15 क्विंटल तर ओलितामध्ये 30 ते 32 क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
2. विजय (फुले जी-81-1-1) – जिरायती, ओलिताखाली तसेच उशिरा पेरणीकरिता प्रसारित केला आहे. मर रोगास प्रतिकारक्षम असून, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल व ओलिताखाली 35 ते 40 क्विंटल व उशिरा पेरणी केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रतिहेक्टर अशी उत्पादनक्षमता आहे.
3. जाकी 9218 – हा देशी हरभऱ्याचा अतिटपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा (105 ते 110 दिवस) आणि मररोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
ब) काबुली हरभरा | kabuli chana –
हा हरभरा छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
1. श्वेता (आय.सी.सी.व्ही.-2) – मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये 85 ते 90 दिवसात तर ओलिताखाली 100 ते 105 दिवसांत पक्व होतो. जिरायतीमध्ये 8 ते 10, तर ओलिताखाली 20 ते 22 क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
2. पीकेव्ही काबुली-2 – मर रोग प्रतिकारक्षम. पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरे पणावर परिणाम होतो. म्हणून या वाणाची लागवड योग्यवेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रतिहेक्टर मिळते.
3. विराट – हा काबुली वाण टपोऱ्या दाण्याचा आहे. हा वाण मररोग प्रतिकारक्षम असून, ओलिताखाली 30 ते 32 क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळते.
4. पीकेव्ही काबुली- 4 – या वाणाच्या दाण्याचा आकार अती टपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या वाणाचे सरासरी उत्पादन 15 क्विंटल एवढे मिळते.
5. गुलाबी हरभरा – गुलक-1 – टपोऱ्या दाण्याचा वाण. मुळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक असून, दाणे चांगले टपोरे, गोल व गुळगुळीत असतात. फुटाणे तसेच डाळे तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी-8 पेक्षा जास्त आहे.
6. हिरवा हरभरा – दाण्याचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो. उसळ, पुलाव करण्यास उत्कृष्ट.
7. पीकेव्ही हरिता – हा वाण ओलिताखाली लागवडीसाठी योग्य. मर रोगास प्रतिकारक. उत्पादन सरासरी 20 ते 22 क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
बीजप्रक्रिया | Seed treatment in chickpea cultivation –
मर, मूळकुज किंवा मानकुज (स्क्लेरोशियम मूळकुज)
रोगांपासून बचाव करण्यासाठी : पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
जिवाणू संवर्धन वापरण्याची पद्धत –
1. रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जीवाणू संवर्धने प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावी.
2. प्रथम 125 ग्रॅम गूळ प्रतिलिटर गरम पाण्यात विरघळून घ्यावा. थंड द्रावणात 250 ग्रॅम प्रत्येक संवर्धन मिसळून लेप तयार करावा.
3. 10 किलो बियाण्यास हा लेप पुरेसा आहे.
4. बियाणे ताडपत्री, फरशी किंवा प्लॅस्टिकवर घेऊन संपूर्ण बियाण्यावर आवरण होईल या प्रमाणे मिसळावे.
5. असे बियाणे सावलीत वाळवावे. त्वरीत पेरणीसाठी वापरावे.
6. बुरशीनाशकांची प्रक्रिया आधीच केली असल्यास अशा बियाण्यास संवर्धन दीडपट वापरावे.
आंतरपिके | Intercropping in chickpea cultivation –
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभ-याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर हरभ-याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभऱ्याचे बेड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.
हरभऱ्यासाठी खतांची मात्रा | Fertilizer management –
हरभऱ्याची पेरणी करताना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावा.
गंधक किंवा जस्ताची कमतरता असणाऱ्या जमिनीत नत्र व स्फुरद यासोबत 20 किलो गंधक किंवा 25 किलो झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावे.
फुलोरा अवस्थेनंतर नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरियाची पहिली फवारणी व त्यानंतर दुसरी फवारणी 10 दिवसांनी करावी.
आंतरमशागत | Inter-culturing operation in chickpea cultivation–
पीक 40 ते 45 दिवसांपर्यंत दोन डवरणीच्या पाळ्या व एक निंदणी आवश्यकतेनुसार देऊन पीक तणविरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन | Water management –
1. उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळीवर असताना (40 ते 45 दिवसांनी), दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (70 ते 75 दिवसांनी) द्यावे.
2. मर्यादित ओलीत असल्यास कमीत कमी एक ओलीत घाटे भरतेवेळी द्यावे.
3. दोन ओळी रुंद वरंबा सरी पद्धतीने ओलीत केल्यास इतर पद्धतीच्या मानाने 30 टक्के पाण्याची बचत होते. तसेच उत्पादनात 20 टक्के वाढ मिळते.
4. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, कळी असताना दुसरे व घाटे भरतेवळी तिसरे पाणी द्यावे.
5. हलक्या जमिनीवर घेतलेल्या हरभऱ्याला मात्र पिकाची स्थिती पाहून उगवणीनंतर ओलीत करावे.
6. अधिक प्रमाणात पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो.
7. जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे.
8. मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नयेत. तसेच पाणी साचू देऊ नये.
9. अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.
10. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास उत्पादनात 30 टक्के वाढ होते, तर दोन पाणी दिल्यास 52 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
काढणी | Harvesting –
1. हरभऱ्याच्या परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडतात.
2. घाटे वाळू लागतात.
3. त्यानंतर पिकाची कापणी करावी.
4. अन्यथा पीक जास्त वाळल्यावर घाटेगळ होऊन नुकसान होते.
5. त्यानंतर खळ्यावर एक दोन दिवस काढलेला हरभरा वाळवून मळणी करावी.
उत्पन्न | Yield –
1. हरभरा पिकाचे जातीपरत्वनेनुसार प्रति हेक्टरी उत्पन्न विभिन्न स्वरूपात आहेत.
2. सुधारीत जातींचा लागवडीसाठी अवलंब करून, हंगाम, लागवडीचे अंतर, पाणी व खतव्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण इ. सर्व बाबींचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा chickpea cultivation: हरभरा लागवड ते काढणी संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर