शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण उन्हाळी भुईमूग लागवड (unhali bhuimug lagwad) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपण आज भुईमूग लागवडीसाठी कोणती जमीन आवश्यक आहे, भुईमुगाचे चे विविध वाण, रासायनिक खते तसेच रोग आणि किडी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही देखील एक भुईमूग उत्पादक शेतकरी असाल तर हा विडियो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा लेख पूर्ण पहा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…
भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक असून, खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र अधिक असते. जरी तुलनेने उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र कमी असले तरी उत्पादकता अधिक असते. महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमूग खालील लागवड क्षेत्र साधारणत: 2.36 लाख हेक्टर, तर उन्हाळ्यात 0.425 लाख हेक्टर एवढे असते. उत्पादकता खरिपात 1082 किलो प्रति हेक्टर असून, उन्हाळ्यात 1451 किलो प्रति हेक्टरी एवढी असते. उन्हाळी भुईमूग लागवड (unhali bhuimug lagwad) करताना योग्य शिफारशीत भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळणे शक्य होते.
जमीन व मशागत | Soil & land preparation –
1. उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी मध्यम प्रकारची व भुसभुशीत जमीन असावी.
2. चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असावे.
3. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन भुईमूग लागवडीसाठी योग्य समजली जाते.
4. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त 12 -15 सें.मी. एवढीच राखावी.
5. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात.
6. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात.
7. परिणामी उत्पादनात घट येते.
8. नांगरणी नंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
9. शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रति एकर याप्रमाणे जमिनीत मिसळावे.
हवामान | Climate –
1. पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
2. फुलोरा अवस्थेत दरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते.
3. अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
4. अति उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
बेस्ट भुईमूग बियाणे जाती | Groundnut variety in maharashtra –
1. भुईमूगाच्या प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत.
2. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच (इरेक्ट – बंची) प्रकारच्या जातींची लागवड करावी.
3. यामध्ये प्रामुख्याने एसबी – 11, टिएजी- 24, फुले उन्नती, टीजी-26, जेएल -24 (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात.
4. टीपीजी -41 ही मोठ्या दाण्याची जात असून, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
5. जे एल -229 (फुले व्यास) हीसुद्धा मोठ्या दाण्याची जात असून, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यासाठी शिफारस आहे.
6. जेएल-501 हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत आहे.
7. जेएल -776 (फुले भारती) या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस आहे.
8. वरील शिफारशीप्रमाणे परिसरात उपलब्ध, उत्पादनक्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.
बियाणे प्रमाण | seed rate of groundnut –
1. जात निहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते.
2. कमी आकाराचे दाणे असलेल्या जाती साठी एकरी 40 किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी 50 किलो, तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी 60 किलो बियाणे वापरण्याची शिफारस आहे.
भुईमूग बीजप्रक्रिया | groundnut seed treatment –
अ) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया
1. पेरणीपूर्वी अर्धा तास आधी थायरम 5 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम किंवा मॅंकोझेब 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा कल्चर (भुकटी) 4-5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा कल्चर (द्रव्य) 3-5 मि.लि. भुईमूग बियाण्यावर लावा.
2. वरील प्रमाण हे प्रती किलो बियाणे प्रमाणे आहे.
3. बीज प्रक्रिया नंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे.
ब) जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया –
1. रायझोबियम कल्चर (द्रव्य) 5 मि.लि. किंवा रायझोबियम कल्चर (भुकटी) 25 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) 5 मि.लि. किंवा स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (भुकटी) 25 ग्रॅम अधिक पोटॅश विरघळवणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) 5 मि.लि. भुईमूग बियाण्यावर लावा.
2. वरील प्रमाण हे प्रती किलो बियाणे प्रमाणे आहे.
3. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर च जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
भुईमूग लागवड कोणत्या महिन्यात करावी? groundnut sowing time in maharashtra –
15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत.
भुईमूग पाणी व्यवस्थापन | groundnut water management –
1. जातीनूसार भुईमुगाचा कालावधी साधारणत: 90 ते 115 दिवसांचा असू शकतो.
2. उन्हाळी भुईमुगाच्या (unhali bhuimug lagwad) ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो.
3. पेरणीपूर्वी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी.
4. पेरणीनंतर 4-5 दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
5. यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा.
6. या दरम्यान जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करावी.
7. फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून 22-30 दिवस) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
8. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून 40- 45 दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून 65-70 दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
9. पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार ठरवावे.
10. एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
11. ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
12. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
भुईमूग खत व्यवस्थापन | fertilizer management in groundnut –
1. पेरणीवेळी प्रति एकरी युरिया 25 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 35 किलो + जिप्सम 150 ते 200 किलो याप्रमाणे द्यावे.
2. सोबतच पेरणीवेळी 4-5 किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स 2 किलो प्रति एकर द्यावे.
3. पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम 150 ते 200 किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.
4. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.
भुईमूग आंतरमशागत | intercultural operations in groundnut –
1. पेरणीपासून साधारण: 10-12 दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
2. पेरणीपासून सुरुवातीच्या 6 आठवड्यांपर्यंत 2-3 डवरणी तसेच 1-2 वेळा खुरपणी करावी.
3. आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून पिकात आंतरमशागतीची कामे (डवरणी) करू नयेत.
भुईमूग पिकातील तन नाशक वापर | groundnut weedicide –
1. पेंडिमिथॅलीन 7 मि.लि. / लीटर प्रमाणे पेरणीनंतर 48 तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना फवारणी करावी. \
2. त्यामुळे पीक सुरुवातीच्या 20 ते 25 दिवस तणविरहीत राखता येते.
3. गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विझालोफॉप इथाईल 2 मि.लि. / लीटर प्रमाणे फवारणी पेरणीनंतर 20 दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना करावी.
4. काही रुंद पानांची तणे तसेच गवतवर्गीय तणे या दोन्हीसाठी, इमाझीथापर या तणनाशकाचा वापर शिफारस व लेबल क्लेम प्रमाणे करावा.
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन | pest and disease management in groundnut –
कीड-रोगांचे नाव | उपाय |
मावा, फुलकिडे व तुडतुडे | 1. प्रादुर्भाव दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 2. दुसरी फवारणी 15 दिवसांनंतर – डायमिथोएट- 500 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात करावी. (प्रतिहेक्टरी) |
पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी | 1. सिजेंटा कंपनीचे एकालक्स 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी साठी वापरावे. 2. गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात. |
टिक्का रोग नियंत्रण | 1. सिंजेंटा कंपनीचे अबिक 2 ग्रॅम किंवा बायर कंपनीचे फॉलिकुर 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. |
तांबेरा रोग नियंत्रण | इंडो क्रोप सोलुशन कंपनीचे कोनॅझोल प्लस 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. |
भुईमूग काढणी | groundnut harvesting –
1. भुईमुगाचा पाला पिवळा आणि शेंगाचे टरफल टणक झाल्यावर आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी.
2. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8 ते 9 टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
3. मगच पुढील साठवणुकीच्या उपाययोजना कराव्यात.
भुईमूग एकरी उत्पादन | groundnut per acre yield –
1. भुईमुगाची सुधारित पद्धतीने पेरणी, योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्टरी 20 ते 25 (खरीप), तर 30 ते 35 (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच 4 ते 5 टन कोरडा पाला मिळण्यास काहीच मज्जाव नाही.
2. अशाप्रकारे आपण हे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा unhali bhuimug lagwad: उन्हाळी भुईमूग लागवड बद्दल संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. उन्हाळी भुईमुगाची लागवड कधी करावी?
उत्तर – काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते.
2. भुईमूग काढणीला किती वेळ लागतो?
उत्तर – भुईमुगाच्या वाणांना परिपक्व होण्यासाठी लागवडीनंतर 85-95 दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या लवकर वाणांपासून ते मध्यम वाण, जे 95-120 दिवसांत कापणीस तयार होतात आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणाला लागवडीनंतर 121 दिवस लागतात.
3. भुईमुगासाठी सर्वोत्तम खत कोणते?
उत्तर – उपलब्ध नायट्रोजनयुक्त खतांपैकी अमोनियम सल्फेट ला भुईमूग पिकासाठी प्राधान्य दिले जाते कारण त्यात सल्फरचे प्रमाण (24%) असते.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412